Pune: विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

पुणे – बावधन (खु.) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. या सोसायटी बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला. या नकाशासंबधी तपास करायचा आहे. तसेच सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा कोठे वापर केला, याचा तपास करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार केला आहे.
मात्र, अजून उत्तर आलेले नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपी विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ब्रह्मा सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अग्रवाल याला अटक करण्यात आले असून, त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात त्याला शुक्रवारी ( दि. ५) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.





