पिंपरी | सूस, बावधन येथे अडकलेल्या रहिवाशांची सुटका

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी पीएमआरडीएची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. प्राधिकरणाच्या अग्निशमन दलामार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा, असे निर्देश पुणे महानगर विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यंत्रणेला दिले आहेत.
पुणे जिल्हयात आज गुरुवारी (दि. २५) झालेल्या अतिवृष्टिमुळे पुण्यातील महापालिका हद्दीतील एकता नगर व सभोवतालच्या परिसरात पुर सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अग्निशमन दलातील ३ पथके २ रबर बोटी व रेस्क्यु उपकरणासहीत येथे पाठविण्यात आल्या. या पथकामार्फत रेस्क्यु ऑपरेशनसाठी महापालिकेच्या अग्निशमन दलास सहकार्य करण्यात आले आहे. तसेच सुस, बावधन भागातील इमारतींमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य सुरु केले आहे.
किरकटवाडी येथे रस्त्यात झाड पडल्याने मोठया प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर पडलेले झाड बाजुला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच वाघोली अग्निशमन केंद्रामधुन दोन पथके विश्रांतवाडी परिसरात स्टॅन्ड बाय म्हणून ठेवली आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने बॅक वॉटरमुळे नांदेड, शिवणे पुलावर दोरखंड बांधून रस्ता बंद करण्यात आला आहे. पुलावरून कोणीही ये-जा करू नये, यासाठी पीएमआरडीए प्राधिकरणामार्फत अग्निशमन बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शांतीनगर येथील रहिवाशी इमारतीमध्ये अडकलेल्या एकूण सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्निशमन अधिकारी व जवान बारकाईने लक्ष्य ठेऊन आहेत. पीएमआरडीए क्षेत्रात पूर येणे, दरड कोसळणे, झाडपडी अशा घटना घडल्यास अग्निशमन सेवा विभाग सेवा देण्यासाठी यंत्रणेसह कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या यंत्रणेला पहाटेपासूनच सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करण्याबाबत तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करण्याच्याबाबत सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी पर्यटनासाठी बाहेर जाऊ नये, अति महत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, तसेच अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी. – डॉ. योगेश म्हसे महानगर आयुक्त, पीएमआरडीए





