Pune : पूर्ण कार्यकाळात जनता दरबार – मुरलीधर मोहोळ

पुणे – खासदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत जनता दरबार राबवला जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. यातील दुसरे अभियान रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात झाले. येथील सलग दुसऱ्या कार्यक्रमाला भर पावसातही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी कसब्याचे आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.खा. मोहोळ यांनी नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न, सोसायट्यांचे विषय, नागरी समस्या ऐकल्या. याबाबत संबंधितांना तात्काळ सूचना केल्या.
अभियानादरम्यान मोदी सरकार आणि महायुतीच्या विविध योजनांचे स्टॉल्स विभागवार लावले होते. यावेळी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल, महावितरणसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“भर पावसातही कसबावासियांनी मोठा प्रतिसाद दिला. वैयक्तिक, सार्वजनिक, सोसायट्याचे प्रश्न नागरिकांनी मांडले. जनता दरबार हा एका दिवसाचा कार्यक्रम नसून प्रश्न सोडवण्यासाठी कामाला सुरुवात होते. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात हा उपक्रम राबवला जाणार आहे.” – केंद्रीय राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ





