Pune: अखेर ठरले… ४ मार्चला सादर होणार महापालिकेचे अंदाजपत्रक

पुणे – महापालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अखेर मुहूर्त लागला आहे. पुढील आठवडयात मंगळवारी (दि.४ मार्च) रोजी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले स्थायी समितीत हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयात अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा आहे. मात्र, महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यापासून गेल्या तीन वर्षात अंदाजपत्रक मार्च महिन्यातच सादर करण्याचा नवा पायंडा पडला आहे.
या अंदाजपत्रकासाठी महापालिकेतील माजी सत्ताधारी भाजपने आपल्या नगरसेवकांना तसेच आमदारांना मोठया प्रमाणात निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या असल्याने त्यावरून मोठया प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता आयुक्त डाॅ. भोसले अंदाजपत्रक सादर करणार असल्याने हे भाजपचे निवडणूकीचे अंदाजपत्रक ठरणार, की शहर विकासाचे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयुक्त डाॅ. भोसले यांचे हे महापालिकेचे पहिलेच अंदाजपत्रक असणार आहे.
रस्ते, भूसंपादन, पाण्यावर राहणार भर
गेल्या वर्षभरात शहरात वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यातच, नव्याने समाविष्ट गावांचा पाण्याचा प्रश्नही समोर आला असून, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प राबविला जात आहे. तसेच, काही प्रमुख चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरही उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





