Pune : उखडलेल्या रस्ते दुरुस्तीचा चौकशी; अतिरिक्त आयुक्तांची माहिती

पुणे : पालिकेने पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची दुरुस्ती केली असून त्यातील अनेक रस्ते आताच खराब झाले आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात खडी विखुरली असून यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उखडलेल्या रस्ते दुरुस्तीची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पालिकेने एप्रिल-मे अखेर शहरातील खोदलेले रस्ते दुरुस्त केले होते. तसेच रस्त्यांवरील खड्डेही बुजविले होते. त्यामुळे पावसाळ्यात दुरुस्त रस्त्यांवर खड्डे पडणे अपेक्षित नाही. मात्र, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने तसेच चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडीही विखुरलेली आहे.
पाच हजार खड्ड्यांची दुरुस्ती
अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत तब्बल ५ हजार १०० खड्डे दुरुस्त केले आहेत. त्यासाठी जवळपास १४ हजार मेट्रिक टन हॉटमिक्सचा वापर केला आहे. त्यासाठी सुमारे २५ हजार ६८७ चौरस मीटर क्षेत्राचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
त्यात ६०९ ठिकाणी चेंबर रस्त्याच्या समपातळीत उचलले असून ‘आदर्श ३३ रस्ते’ योजनेतील २८ रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. याशिवाय महावितरण, खासगी केबल कंपन्या, एमएनजीएलने केलेल्या खोदाईनंतर ठेकेदारांच्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती केली आहे.
दोष दायित्व कालावधी काय?
पालिकेकडून एखाद्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा नवीन रस्ता केल्यास, हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे रस्त्यावर खड्डे पडल्यास किंवा रस्त्याबाबत काही समस्या उद्भवल्यास ती दूर करण्याची जबाबदारी असते. त्यासाठी कामाच्या स्वरूपानुसार एक कालावधी निश्चित केला जातो. त्यामुळे, रस्ता खराब झाल्यास संबंधित ठेकेदार जबाबदार असतो. मात्र, संबंधित रस्त्यावर महापालिका किंवा खासगी व्यक्तीने कोणतीही खोदाई केल्यास, हा दोष दायित्व कालावधी समाप्त होतो.
‘पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांबाबत काही तक्रारी आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खडी पडल्याच्याही तक्रारी आहेत. अशा कामांची तपासणी केली जाईल. तसेच दोष दायित्व कालावधीनुसार संबंधितांकडून ती दुरुस्त करून घेतली जाईल.’ – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त





