PUNE: पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू

पुणे – पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू झाली. याचे उद्घाटन आज (दि. 10) सीमा शुल्क पुणे विभागाचे (कस्टम) आयुक्त यशोधन अरविंद वनगे यांच्या हस्ते झाले. शेतकर्यांना आता पुण्यातून परदेशात मालवाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यातील उद्योजक, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, कस्टमचे अतिरिक्त आयुक्त विक्रम चंद मेका, कार्गेचे उपसरव्यवस्थापक प्रदीप कुमार सिंह यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांर्तंग कार्गो सेवा सुरू आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. परदेशात कार्गो पाठविण्यासाठी कस्टम विभागाची परवानगी आवश्यक असते. पण, ती परवानगी न मिळाल्यामुळे एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा रखडली होती.
यासाठी विमानतळ प्रशासनाकडून कस्टम व इतर विभागाकडे सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर अखेर कस्टमने आंतरराष्ट्रीय कार्गो सेवे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान पुण्यातून आंतरराष्ट्रीय कार्गो पाठविण्यास परवानगी मिळाली आहे. पण, पुण्यात सध्या थेट विमानसेवा सुरू असलेल्या शहरांमध्येच माल पाठविला जाऊ शकतो. तसेच, त्या शहरातून मालवाहतूक पुण्यात करता येणार आहे. सध्या पुण्यातून थेट विमान सेवा सिंगापूर आणि दुबई शहरांसाठी आहे. कनेक्टिंग विमान सेवेच्या माध्यमातून माल पाठविण्यास परवानगी असली तरी त्यासाठी विमान कंपन्यांना वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कनेक्टिंग विमान सेवेच्या माध्यमातून इतर शहरांमध्ये माल पाठविण्यास उशीर लागणार आहे.





