PUNE: गुंड शरद मोहोळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वकिलांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे : गुंड शरद मोहोळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन वकिलांच्या पोलीस कोठडीत ११ जानेवारी पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ॲड. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव, ता. मुळशी), ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी काॅलनी, कोथरुड) अशी दोघांची नावे आहेत.
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला होता. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली होती. यातील दोन वकिलांना ८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्यावेळी तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात सांगितले की, १५ डिसेंबर २०२३ रोजी शरद मोहोळ खून प्रकरणातील ६ आरोपीं हे एकत्र भेटले होते. या भेटीनंतर आरोपीने वकील रवींद्र पवार याला फोन केला होता. ५ जानेवारी रोजी मुन्ना पोळेकर आणि त्यांच्या सहकारी हे सातारा रोड ने पळून जात होते. या दरम्यान आरोपी वकील रवींद्र पवार आणि संजय उडान हे त्यांना खेड शिवापूर टोल नाक्या समोर जाऊन भेटले.
यावेळी या दोन्ही वकिलांनी आरोपींन सोबत १५ किलोमीटरचा एक ते दीड तास प्रवास केला. यानंतर सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपवर सगळे आरोपी थांबले होते. त्यावेळी या आरोपीना भेटायला त्यांचे नातेवाईक आले. यातील एका नातेवाईकाने आरोपींना एक नवीन सिम कार्ड दिले. हे सगळे आरोपी वकिलांसमोर सुरु होते. आरोपी आणि ऍड रवींद्र पवार, ऍड संजय उडान या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पंचा समोर आरोपींकडून शस्त्र, रोख रक्कम हस्तगत केली आहे.
तसेच सरकारी वकील निलीमा इथापे यादव यांनी न्यायालयास सांगितले की, या गुन्ह्याच्या तपासात प्रगती आहे. शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर आरोपींनी पवार आणि उडान यांच्याशी संपर्क केला होता. जर आरोपीना शरण यायचे होते तर त्यांनी सिम कार्ड का बदले. तसेच पुण्याच्या विरुद्ध दिशेने ते का प्रवास करत होते. ऍड रवींद्र पवार आणि ऍड संजय उडान हे आरोपींना नेमके कुठं घेऊन जाणार होते, कुठे लपवून ठेवणार होते याचा सखोल तपास करायचा असल्याने ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.
आरोपी वकिलांच्या वतीने ऍड सुधीर शहा, ऍड एन. डी. पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी ऍड सुधीर शहा यांनी न्यायालयात सांगितले की, शरद मोहोळचा खून झाला तेव्हा ऍड पवार, ऍड उडान हे उपस्थित नव्हते. आरोपी हे पवार आणि उडान यांचे क्लाईंट होते. पवार आणि उडान या वकिलांनी आरोपींचे ४ वेळा वकीलपत्र घेतले आहे. यामुळे पवार आणि उडानवर भादंवि ३०२ सारखे कलम लागू होत नाही.
गुन्हा घडला तेव्हा मी न्यायालयात होते- ऍड रवींद्र पवार
शरद मोहोळ याचा खून झाला. त्यावेळी मी न्यायालयात होतो. या गुन्ह्यातील इतर आरोपीचे अनेक वेळा वकीलपत्र घेतले होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपी हे ऍड संजय उडान यांचे क्लाईंट आहेत. मी आणि उडान सोबत काम करत होतो. घटनेच्या दिवशी उडान यांनी फोन करून शरद मोहोळचा खून झाला असून आरोपीना शरण यायचे असल्याचे सांगितले. यानंतर मी कोर्टातील काम संपवून उडान यांना घेऊन गेलो. यावेळी पूर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात आणि आता मुंबई येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना फोन करून आरोपीना शरण यायचे असल्याचे सांगितले.
हर्षल कदम यांनी तुम्ही मुलांशी बोला आणि शरण व्हायला सांगा असे सांगितले. यानंतर आरोपीना सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपवर भेटलो. यावेळी आरोपीना त्यांचे काही नातेवाईक येईन भेटले. आरोपींनी शरण जाण्याची तयारी दर्शवली. मागावर पोलीस असेल यामुळे आरोपी सोबत प्रवास केला. तसेच या आरोपीना शरण कसे जायचे हे सांगितले . मात्र तेवढ्यात पोलीस आले आणि आम्हाला ताब्यात घेतले.





