Pune : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात वाढ

कात्रज – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ बुधवार (दि.२७) पासून लागू होणार आहे.
या निर्णयानुसार ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतीच्या गायीच्या दुधासाठी प्रति लिटर ३४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, वरकड खर्चासह दूध संस्थांसाठी हा दर प्रति लिटर ३४ रुपये ८० पैसे इतका राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने उपमुख्यमंत्री पवार यांनी दूध खरेदी दरात वाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी संघाचे चेअरमन ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी तातडीने केली.
शेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य असल्याचे चेअरमन ॲड. ढमढेरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांना संघाकडे स्वच्छ, ताजे आणि भेसळविरहित, उच्च प्रतीच्या दुधाचा जास्तीत जास्त पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.





