पुणे -मार्केट यार्डमधील हमाल, कामगार, तोलणार, आडते, टेम्पोचालक, हातगाडी कामगार, महिला कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, टेम्पो संघटनेचे सचिव चंद्रकांत जावळकर यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना निवेदन दिले आहे. करोना संसर्गात बाजार आवारातील प्रत्येक घटकाने काम केले. भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. येथील पाच कामगारांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. अनेक कामगार बाधित होत आहेत. त्यांच्यावर उपचार करणेदेखील परवडत नाही.
खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पैसे कसे भरायचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. करोनाबाधित कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतदेखील मिळाली नाही.बाजार आवारात काम करणाऱ्या घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.