पुणे : शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा फटका महावितरणच्या वीज पुरवठ्याला बसत आहे. अनेक भागात महावितरणच्या भूमिगत वाहिन्या आणि फिडरपिलर पदपथावर आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने निर्माण होणारी आर्द्रता (हवेतील वायुरूप पाण्याचे प्रमाण) वाढल्याने वीज वाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात बिघाड होत आहेत. परिणामी, वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. शहरातील वीज पुरवठयासाठी तसेच सुरक्षेसाठी महापालिका आणि महावितरणकडून भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जातात. या वीज वाहिन्यांमधून नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी फिडर पिलर उभारले आहेत. तसेच अनेक चौकात महावितरणने डीपी बसविले आहेत.अशा ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानंतर फिडर पिलरमध्ये ब्लास्ट होतात. परिणामी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठाच खंडीत होत आहे. शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांवर असे शेकडो फीडर पिलर बसविले आहेत. पावसाळ्यातील साचलेले पाणी फिडर पिलरमध्येही घुसत असल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. तसेच पाण्यात वीज पुरवठा प्रवाहीत झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. दुसरीकडे शहरात पाणी साचण्याची ठिकाणे वाढतच असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.