Pune News : पुणे शहरात अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाईच्या सखोल विश्लेषणातून शहरातील तब्बल २२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ड्रग्जची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता ‘ड्रग फ्री पुणे’ या मोहिमेअंतर्गत व्यापक आणि आक्रमक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी (दि. २४) पोलिस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “शहरात अमली पदार्थांविरोधात निर्णायक लढा उभारला जाईल,” असे सांगितले. या बैठकीस सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त आणि विविध विभागांचे उपायुक्त उपस्थित होते. पोलिसांनी आखलेल्या नव्या रणनीतीनुसार, प्रत्येक झोन स्तरावर स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकांना विशेष प्रशिक्षण देऊन तस्करांवर थेट आणि समन्वयित कारवाई केली जाणार आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांची संयुक्त मोहीम एकाचवेळी राबवली जाणार असल्याने तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, आता पान टपऱ्या, लहान दुकाने आणि संशयित ठिकाणेही पोलिसांच्या रडारवर आली आहेत. शहरातील काही भागांमध्ये अशा ठिकाणांवरून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांच्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. लक्ष्मीनगर, येरवडा, कोंढवा, काळेपडळ, डेक्कन, खडक, शिवाजीनगर, लष्कर, मुंढवा, वानवडी, लोहगाव, वाघोली, खराडी, लोणीकंद, खडकी, सहकारनगर, बाणेर, लोणीकाळभोर, वारजे माळवाडी, पर्वती आणि मार्केटयार्ड या भागांमध्ये अमली पदार्थांची हालचाल अधिक असल्याचे समोर आले आहे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ठोस कारवाईसाठी विशेष मॉडेल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग असावा यासाठी पोलिस लवकरच विशेष मोबाइल ॲप सुरू करणार आहेत. या ॲपद्वारे नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती गोपनीय पद्धतीने पोलिसांना देता येणार आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. “ड्रग्जविरोधातील ही लढाई केवळ पोलिसांची नसून संपूर्ण समाजाची आहे,” असे आवाहन करत पोलिस प्रशासनाने नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पुणे शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी आता प्रशासन आणि नागरिक यांची संयुक्त मोहीम निर्णायक ठरणार आहे.