पुणे | कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात, आवकही घटली

पुणे (प्रतिनिधी) – रत्नागिरी हापूसचा हंगाम संपल्यानंतर आता कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अक्षय तृतीयेला २५ हजार पेटीची आवक होणाऱ्या या आंब्याची आवक आता ५ हजार पेटी होत आहे. ५ ते १० जूनपर्यंत ही आवक सुरू राहील, असे कर्नाटक हापूस आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटक आंबा लाकडी पेट्यातून येत असतो. मात्र, कर्नाटक, केरळ भागात झाडे तोडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पेटीसाठी लाकडे उपलब्ध नसल्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी स्थानिक मार्केटलाच माल विकण्यास प्राधान्य दिले आहे. ज्यांच्याकडे पेटीसाठी लाकुड उपलब्ध होत आहे. तेथून आवक होत आहे.
कर्नाटक हापूसच्या ३ ते ५ डझनाच्या कच्चा मालाच्या पेटीला घाऊक बाजारात १००० ते १५०० रुपये भाव मिळत आहे. तयार मालाच्या पेटीला पाचशे रुपये जास्त मोजावे लागत आहेत.
हंगामाविषयी रोहन उरसळ म्हणाले, गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे आवकवर परिणाम झाला होता. मात्र, यावर्षी मार्केट सुरू आहे. वेळेचे बंधन असेल तरीही लॉकडाऊनमध्ये आंब्याची आवक आणि विक्री होत आहे.





