विश्रांतवाडी – वडगावशेरी मतदारसंघातील गेल्या अनेक दिवसांपासून विविध भागांमध्ये होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. परिषदे दरम्यान, पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करा, अशी मागणी यावेळी पालिका प्रशासनाकडे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली आहे. वडगावशेरी, लोहगाव व खराडी-चंदननगर भागातील बोराटे वस्ती, राघोबा पाटील नगर, थिटे नगर, तुळजाभवानी नगर, शेजवळ पार्क, साईनाथ नगर, काळुबाई नगर, सोमनाथ नगर, पठारे ठुबे नगर, चौधरी वस्ती, श्री कृष्ण सोसायटी, सोमनाथ मळा, गणपती हौसिंग सोसायटी, साई पार्क, जुने साई बाबा मंदिर, चंद्रभागा सोनाई पार्क, विडी कामगार, अष्टविनायक नगर, यशवंत नगर, साई नगरी, सातव वस्ती, अनुसया पार्क, आपले घर, राजाराम पाटील नगर, खराडी गाव आदी भागात मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास आले. ऐन सणांच्या तोंडावर पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र तसेच अन्य जलकेंद्रे व विविध पाण्याच्या टाक्यांच्या देखभाल-दुरुस्ती करण्याच्या कारणास्तव मागील आठवड्यात शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. अजूनही पाणी कमी दाबाने येत असल्याचे दिसून येत आहे. बाटलीबंद पाणी आणून नागरिक तहान भागवत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईसोबतच नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन भगत, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, महादेव पठारे, संजीला पठारे, आशिष माने, संकेत गलांडे आदी उपस्थित होते. “पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरने पाणी घेण्याची वेळ आली आहे. सणांचे दिवस सुरू असताना अशा पद्धतीची निर्माण झालेल्या पाणी टंचाईकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. पाणीसाठा मुबलक असूनही पाणी कमी दाबाने सोडण्याचे किंवा विस्कळीत पाणीपुरवठा करण्याचे कारण काय? आचारसंहितेत आंदोलन करता येत नाही व पाणी न मिळणे हे योग्य नाही. पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही, तर कार्यकर्ते आंदोलन करतील.” – बापूसाहेब पठारे, माजी आमदार, वडगावशेरी