पुणे : सूस रस्त्यावरील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलने शासनाकडून परवानगी न मिळाल्याने उद्यापासून शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचे पालकांना सांगितले. ही माहिती कळताच पालकांसह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. प्रवेश घेण्यापूर्वी शाळेने ही बाब सांगणे अपेक्षित होते. शाळेच्या हलगर्जीपणाचा फटका आता शेकडो विद्यार्थ्यांना बसणार आहे. ऐनवेळी शाळा बंद केली जाणार असल्याने आता मुलांच्या शिक्षण कसे होणार, असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित झाला आहे. या प्रकरणी सर्व पालक शाळेत एकत्रित येत शाळा व्यवस्थापनास जाब विचारला. शाळा सुरू करण्याची कायदेशीर परवानगी मिळाली नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी शाळा बंद राहणार असल्याचे सीबीएसई बोर्डाच्या ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलने पालकांना कळविले. त्यामुळे पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, शाळेने संस्थेच्या हिंजवडी शाखेत मुलांचे प्रवेश दिले जातील व ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय पालकांपुढे ठेवला. या प्रस्तावास पालकांनी विरोध केला आहे. हिंजवडी येथे दीड तास प्रवास करून विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पाठविणे गैरसोयीचे आहे. लाख रुपये शुल्क भरून ऑनलाइन शिक्षण घेणार नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर शाळेने शासनाकडून परवानगी घेण्यासाठी ४५ दिवसांची मुदत मागितली. या वेळेत परवानगी न मिळाल्यास सर्व शुल्क परत करण्याचे आश्वासन शाळेने दिले. शाळेचे सर्व म्हणणे पालकांनी धुडकावून लावले. याबाबत शाळेशी संपर्क साधले असता, ते होऊ शकले नाही. ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे पोहोचलाे. शाळा कधी सुरू होणार आहे आणि गणवेश आणि पुस्तके कधी खरेदी करायची, याबाबत चौकशी करावयाची होती. मात्र, येथे पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेला सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले. हे एकताच मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर कदम या या पालकानी दिली. ऑर्किड्स ही शाळा पूर्वी ग्रामीण भागात होती. आता ती पालिका हद्दीत आहे. शाळेने परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती आहे. मात्र, शाळेला परवानगी मिळाली की नाही, यासह अन्य चौकशीची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांना शाळेत पाठविले आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील. – सुनंदा वाखारे, प्रशासन अधिकारी, महापालिका