Pune: सत्य आणि सकारात्मकतेच्या बेरजेत मानवाचे हित

पुणे – मानवाच्या कल्याणाचा धर्म, सत्याचा धर्म, विवेकाचा धर्म यातील सत्य गोष्टी जगासमोर ग्रंथस्वरूपात आणण्याचा मनोदय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
सबनीस यांनी सोमवारी दैनिक प्रभातला सदिच्छा भेट दिली. दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांची भेट घेऊन उपरोक्त मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी प्रभातचे बातमीदार, उपसंपादक, डिजिटल प्रभातच्या बातमीदारांशी त्यांनी या विषयावर संवाद साधला.
वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करताना हा ग्रंथनिर्मितीचा संकल्प आपण केला आहे. या ग्रंथामध्ये जाती, धर्म, पंथ, विचारसरणी यापलीकडे जाऊन केवळ मानवता धर्माच्या दृष्टीने चांगले ते स्वीकारून एकत्रित मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचे सबनीस म्हणाले.
या संकल्पात समाजातील अनेक घटकांशी, त्यामध्ये सर्व वृत्तपत्रातील संपादक, बातमीदार, उपसंपादक यांच्याशीही चर्चा करून मत जाणून घेत असल्याचे सबनीस यांनी नमूद केले. संवाद अणि संघर्ष याचा विचार करत संवादाला अधिक प्राधान्य देणार आहे. यातून लोककल्याण साधण्याचा उद्देश आहे.
हा ग्रंथ कसा साकारणार, या बाबतचे निकष निश्चित केले असून, त्यानुसारच ग्रंथाची मांडणी करणार आहे. धर्म किंवा विचार कोणताही असो, त्यातील सत्याची आणि सकारात्मकतेची बेरीज या ग्रंथात केली जाणार आहे. बहुविध भाषेत हा ग्रंथ निर्माण करण्याचा मनोदय असल्याचे सबनीस यांनी सांगितले.
ग्रंथात नकारात्मकता किंवा टीका यापेक्षा सकारात्मकतेला अधिक महत्त्व दिले जाणार असून, एखादी न पटणारी विचारसरणी असली, तरी त्यातील चांगले विचार ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही सबनीस यांनी स्पष्ट केले.





