Pune Hooch Tragedy : “साहेब, माझा नवरा गेला ओ… लेकरांना कोण सांभाळणार?” फुगेवाडी दुर्घटनेतील पत्नीचा हंबरडा; नेत्यांचेही डोळे पाणावले
Pune Hooch Tragedy : फुगेवाडी विषारी दारू दुर्घटनेतील पीडित कुटुंबांची राजकीय नेत्यांकडून भेट; हंबरडा फोडणाऱ्या तरुण विधवेच्या आक्रोशाने वातावरण स्तब्ध.

Pune Hooch Tragedy – फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांसमोर एक तरुण विधवा पत्नीने आपल्या संसाराची व्यथा मांडताच उपस्थितांचे डोळे पाणावले. पतीच्या निधनानंतर उभ्या राहिलेल्या संकटांचा पाढा वाचताना तिचा कंठ दाटून आला. राजकीय नेत्यासमोर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याची व्यथा मांडताना तीने हंबरडा फोडला.
“साहेब, माझा नवरा गेला… आता माझ्या लेकरांना कोण सांभाळणार? घर चालवायचं कसं? मुलांना शिकवायचं कसं? आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं?” असे म्हणत तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. पती रोज कामावर जाऊन घरखर्च भागवत होता. मुलांच्या शिक्षणापासून वृद्ध आई-वडिलांच्या औषधोपचारापर्यंत प्रत्येक जबाबदारी तो सांभाळत होता. मात्र दुर्घटनेच्या एका घटनेने तिचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला.
राजकीय नेते तिचे सांत्वन करत असताना तिने आपल्या घरातील वास्तव मांडले. आम्ही गरीब माणसं आहोत. दिवस काढण्यासाठी नवरा कष्ट करायचा. घरभाडे, किराणा, मुलांची फी, औषधोपचार हे सगळं तोच बघायचा. आता घरात कमावणारं कोणीच उरलं नाही. उद्या लेकरांना दोन वेळचं जेवण कसं द्यायचं, हाच प्रश्न आहे, हे सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या लहान मुलांनीही वडिलांच्या आठवणीने रडायला सुरुवात केली.
बाबा कधी येणार? असा प्रश्न मुलांनी विचारताच त्या महिलेचा बांध फुटला. उपस्थित अनेकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. माझ्या नवऱ्याने लेकरांसाठी खूप स्वप्नं पाहिली होती. मुलांनी मोठं व्हावं, चांगलं शिकावं म्हणून तो राबत होता. पण आज तोच नाही. त्याची स्वप्नं कोण पूर्ण करणार? असा सवाल तिने नेत्यांसमोर उपस्थित केला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अनेक व्यक्ती हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित कुटुंबांवर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट कोसळले आहे.
अनेक महिलांवर आता संसाराचा गाडा एकटीने ओढण्याची वेळ आली आहे. पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना काही नेत्यांनी मदतीचे आश्वासन दिले. मात्र त्या तरुण पत्नीच्या आक्रोशातून दिसून येणारी वेदना आणि भविष्याची चिंता कोणत्याही आश्वासनापेक्षा मोठी होती. घराच्या कोपऱ्यात लावलेल्या पतीच्या छायाचित्राकडे पाहत ती शेवटी एवढेच म्हणाली, साहेब, मदत करा.
माझ्या लेकरांचं शिक्षण थांबू देऊ नका. त्यांचं भविष्य वाचवा. माझा नवरा परत येणार नाही, पण त्याची लेकरं तरी उघड्यावर पडू नयेत. तिच्या या शब्दांनी घरातील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. फुगेवाडी दुर्घटनेत गेलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे अशीच एखादी पत्नी, एखादं लेकरू आणि उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब उभं असल्याची जाणीव त्या क्षणी सर्वांना झाली.






