pune : आचारसंहितेत महापालिका सभा घ्या; मात्र निर्णयांना बंदी
pune :

निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण
पुणे – विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत महापालिकेच्या आवश्यक सभांना परवानगी असेल. मात्र, त्यात कोणतेही धोरणात्मक आणि निधी वितरणासंबधीचे निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आले आहेत.
पुण्यासह राज्यातील १७ जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्यसभेसह अन्य समितींच्या सभा घ्याव्यात की नाहीत, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत महापालिकेने जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयाला पत्र पाठवून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
त्यानुसार निवडणूक कार्यालयाने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात महापालिकेच्या सभांमध्ये होणारे निर्णय, घोषणा, ठराव आणि कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असून, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही,
याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या आदेशाद्वारे करण्यात आल्या आहेत. याशिवाय आचारसंहितेच्या कालावधीत पदाधिकाऱ्यांना केवळ घरी येण्या-जाण्यासाठी अधिकृत वाहनांचा वापर करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





