पुणे : उद्योगपतीच्या भरधाव ऑडीने स्वीगी डिलिव्हरी बॉयला चिरडले

एबीसी फार्म येथे मध्यरात्री घडला अपघात : तीघे जखमी
पुणे : कोरेगाव पार्क भागाील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्री एक उद्योगपतीच्या भरधाव ऑडी कारने दोन दुचाकींना धडक दिली. कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पहाटे मोटारचालक तरुणाला अटक केली. तो मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे
यासदंर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलकंठ जगताप यांनी सांगितले की , रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो फुड डिलिव्हरीचे काम करतो. याप्रकरणी काररचालक आयुष प्रदीप तयाल ( ३४, रा. मगरपट्टा, हडपसर) याला अटक करण्यात आली.
त्याची रांजणगावला इलेक्टॉनिक्सची कंपनी आहे. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्याने दुचाकीस्वार रौफ शेख डिलिव्हरी देण्यासाठी मुंढव्याकडे निघाला होता. त्यावेळी आयुषच्या भरधाव वेगाने निघालेल्या ऑडीने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तीन तरुण फेकले गेले.
सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर कारचालक आयुषने दुचाकीस्वार रौफला धडक दिली. अपघातात रौफ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काररचालक आयुष पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राैफला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.





