Pune High Alert: दिल्लीतील बाॅम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ

पुणे : दिल्लीत लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या कारमधील बाॅम्बस्फोटानंतर शहरात सतर्कतेचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी एका मोटारीत बाॅम्बस्फोट झाला. बाॅम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला, तसेच 30हून अधिक नागरिक जखमी झाले. दिल्लीत बाॅम्बस्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
दिल्लीतील बाॅम्बस्फोटानंतर पुणे शहर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकासह स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे. बेवारस वस्तू, तसेच संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष (११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





