पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण एक मुहूर्त असलेला दसरा गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) आहे. या पार्श्वभूमीवर फूलबाजार बहरला. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचा फटका आवकवर बसला आहे. नेहमीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यातच बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये भिजलेल्या मालाचे प्रमाण ६० टक्के आहे. ग्राहकांकडून मात्र दर्जेदार मालाला मागणी आहे. सध्या घाऊक बाजारात एक किलो ओल्या झेंडूला ३० ते ४० रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. बुधवारी (१ सप्टेंबर) झेंडूची आवक आणखी वाढण्याची शक्यता फूल बाजारातील व्यापारी अरुण वीर आणि सागर भोसले यांनी वर्तविली आहे. दसऱ्याला घरोघरी पूजन केले जाते. तोरण बनविले जाते. गाडी अथवा इतर गोष्टींना हार केला जातो. त्यामुळे फुलांना मागणी असते. विशेषता झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. याबरोबरच गुलछडी, शेवंती, अष्टरला मागणी आहे. मार्केट यार्डातील फूलबाजारात मंगळवारपासून (दि.३०) झेंडूची मोठी आवक सुरू झाली. इतर फुलांचीही आवक नेहमीच्या तुलनेत जास्त आहे. पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड, हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस पाठविला. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीचा फटका फुलांना बसला आहे. भिजलेला आणि दर्जाहीन मालाचे प्रमाण जास्त आहे. शहर आणि उपनगरातील घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून फुलांची खरेदी बुधवारी (दि.१) केली जाणार आहे. मंगळवारी फुलांची आवक वाढली आहे. मात्र, दसऱ्याच्या तुलनेत आवक कमी आहे. आज पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बुधवारी आवक वाढण्याची शक्यता आहे. – सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड घाऊक बाजारातील फुलांचे दर झेंडू (सुका) – १०० ते १२० रुपये झेंडू (ओला) – ३० ते ४० रुपये गुलछडी – ५०० ते ७०० रुपये शेवंती – १०० ते २५० रुपये