Pune heavy rainfall | जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! पूर्व हवेली जलमय, सोलापूर महामार्ग ठप्प

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – पूर्व हवेलीत रविवार (दि.१४) रात्रीपासून ढगफुटीचा कहर अनुभवयास मिळाला. मुसळधार पावसाने लोणी काळभोर कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरूळी कांचन परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला होता. काही गाव -वाडी वस्त्यांचा संपर्क तुटला होता. दशकांनंतर पावसाचे पाणी थेट सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतूक मध्यरात्री ठप्प झाली होती. ढगफुटीसदृश्य पावसाने पूर्व हवेलीत दाणादाण उडवली आहे. दरम्यान, बारामती, पुरंदर, शिरूर तालुक्यात शेतीची वाताहात झाली आहे.
जिल्ह्यात फुलशेती, ऊस, कोथिंबीर, पालक हे पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला आहे.लोणी काळभोर रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याकडून येणारी वाहतूक बंद झाली होती. पावसामुळे काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने वाहून गेली तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने रविवारी मध्यरात्रीपासून वीजपुरवठा बंद होता. बँकांचे सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते.
खडकवासला धरणातून विसर्ग व अतिवृष्टीमुळे मुळा-मुठा नदीला पूर आला. नदीचे पाणी एमआयटी विद्यापीठात शिरले होते. हे पाणी थेट रेल्वे पुलापर्यंत पोहोचले. रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे कंपनीचा काही काळ संपर्क तुटला होता. कदमवाकवस्ती येथील घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने ५०० हून अधिक घरांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोलापूर महामार्गाची वाताहात..
मुसळधार पावसाने थेट सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक रात्रीपासूनच ठप्प केली होती. अनेक ठिकाणी महामार्गालगत तसेच नैसर्गिक ओढे नाले अतिक्रमणांनी वेढल्याने राष्ट्रीय महामार्गावर कवडी पाट ते उरुळीकांचनपर्यंत महामार्ग पुराचे पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली होती. थेऊर परिसरातील नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात महसूल प्रशासनाला यश आले.





