पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊस पडत आहे. मागील 24 तासांत खडकवासला धरणात 18 मिमी, पानशेतमध्ये 25 मिमी, वरसगावमध्ये 26 मिमी आणि टेमघरमध्ये 23 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सद्यःस्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.25 टीएमसी पाणीसाठा असून, हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा 1.35 टीएमसी इतका जादा आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये रविवारी दुपारी चांगला पाऊस झाला. सद्यःस्थितीत धरणाच्या पाणलोट परिसरातील ओढे-नाल्यातून पाणी वाहत असून, हे पाणी धरणात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची संततधार अशीच काम राहिल्यास धरणात आणखी वेगाने पाणी जमा होईल. पर्यायाने धरणाची पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात होईल. रविवारी पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांमध्ये पावसाचा चांगला जोर होता. रविवारी दिवसभरात पानशेत धरणात 21 मिमी, वरसगावमध्ये 23 मिमी आणि टेमघरमध्ये 20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला धरणात रविवारी दिवसभरात 2 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणात 0.91 टीएमसी, पानशेत धरणात 1.44 टीएमसी, वरसगावमध्ये 2.84 टीएमसी आणि टेमघर मध्ये 0.01 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.