Pune: कात्रजकरांकडून दिंड्यांना मनोभावे निरोप; सामाजिक संस्था, मंडळांनी केली वारकऱ्यांची सेवा

कात्रज – कात्रज परिसरात संत श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील दिंड्या मुक्कामी होत्या. विठुनामाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत धार्मिक कार्यक्रम व वारकऱ्यांच्या सेवेत आबालवृद्ध दंग झाले होते. मंगळवारी परिसरातील नागरिकांनी मनोभावे या दिंड्यांना निरोप दिला.
कात्रज-कोंढवा रोड येथे एपीजे अब्दुल कलाम क्रीडासंकुल येथे माजी नगरसेवक प्रकाश कदम, अनिल ढवण व प्रतीक कदम यांच्याकडून वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. श्रीनिवास संकुल सोसायटीच्या वतीने अध्यक्ष मंगेश भगत व पदाधिकाऱ्यांनी दिंडीच्या वारकऱ्यांना अन्नदान केले. संतोषनगर येथे आळंदी ते पंढरपूर पायी तीर्थयात्रेमधील ११९ क्रमांकाच्या दिंडीचा मुक्काम संतोषनगर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये असतो. वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. हे ३२ वे वर्ष आहे.
डॉ. अरविंद झेंडे यांच्या वतीने मंदिरामध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषध व गोळ्या दिल्या जातात, अशी माहिती मंदिराचे संस्थापक भगवान शिंदे यांनी दिली. माऊली गार्डन येथे माजी नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम व यंत्रनिर्माण पतसंस्था यांच्या वत्तीने वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. शिव-पार्वती मंगल कार्यालय येथे गजराज सोशल फाउंडेशनतर्फे महेश धूत यांनी वारकऱ्यांना अन्नदान केले.
महापालिकेचे हनुमंतराव थोरवे विद्यालय शाळा क्रमांक १६२ येथे भोर येथील राजगड पायी दिंडी सोहळा, बीड येथील पावन धाम दिंडी, दिंडी क्रमांक एक सांगली दिंड्या मधील वारकऱ्यांना अल्पोपहार व भोजन देण्याची सेवा माजी नगरसेवक विशाल तांबे आणि सर्जेराव शिळीमकर यांनी केली. राजगड ग्रुप बालाजी नगर तर्फे फलटण येथील पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजन सेवा दिल्याचे संयोजक सचिन भोसले यांनी सांगितले.
सावंत विहार सोसायटी फेज नंबर तीन यांच्यातर्फे अन्नदान करून टाळकरी विणेकरी यांचा सन्मान करण्यात आला. आंबेगाव पठार परिसरातील भाविक शंकर कडू यांनी हभप नवनाथ महाराज लिमण यांच्या कीर्तनाचे आयोजन करून भाविकांना अन्नदानाची सेवा करण्यात आली.
श्री शनि मारुती प्रतिष्ठान च्या वतीने वारकरी सांप्रदाय यांचे भजन कीर्तन प्रवचन व भोजन या कार्यक्रमाचे गेली 27 वर्षापासून आयोजन करण्यात येते आहे. भुलेश्वर येथील दिंडी क्रमांक 67 आखाडे महाराज व माननीय जगताप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी विलास कुलकर्णी यांच्या वतीने वारकऱ्यांना धोतर देण्यात आले. या कार्यक्रमासाठी किशोर गादिया, यशवंत डिंबळे, पंडितराव पवार, महादेव शिंदे, मुन्ना गायकवाड, अमित काजगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक दिगंबर डवरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.





