Accident News : कात्रजमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ट्रकच्या धडकेत ३ वर्षीय चिमुरड्याचा जागीच अंत
Accident News : अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका चिमुरड्याचा बळी गेला.

Accident News : कात्रज परिसरातील ‘डेथ ट्रॅप’ ठरणाऱ्या रस्त्यांवर अपघातांचे सत्र सुरूच असून, शनिवारी सकाळी एका निष्पाप चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला. वंडर सिटीसमोर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:०० च्या सुमारास अंश भाऊरंग कांबळे (वय ३ वर्ष, रा. अंजनी नगर, कात्रज) हा आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (क्रमांक MH12 TE 2937) जात होता. कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वंडर सिटीसमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक MH19 CY 9572) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अंश ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई (Accident News)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५०, रा. निलंगा, लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कात्रज बनले ‘अपघात केंद्र’
कात्रज परिसरात अपघातांचे प्रमाण भयावह पद्धतीने वाढले आहे. या मार्गावर चोवीस तास अवजड वाहनांची वर्दळ असते, ज्यावर प्रशासनाचे नियंत्रण सुटल्याचे दिसते. तसेच रस्त्यावरील निसरडेपणामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका चिमुरड्याचा बळी गेला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता “प्रशासन अजून किती बळींची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना आणि वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा:





