Pune : लटकणारे रेल्वे प्रवासी रडारवर; कुर्ला दुघटनेनंतर पुणे रेल्वे सावध

पुणे – रेल्वे दरवाजाला लटकून किंवा पायऱ्यांवर बसणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांतील विशेष मोहिमेत लटकत प्रवास करणाऱ्या १०५ जणांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून प्रवास करणारे काहीजण खाली पडून प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने धोकादायक प्रवास रोखण्यासाठी ११ ते २५ जून दरम्यान विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांत दरवाजाउभे राहून अथवा लटकत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली.
तीन महिने शिक्षा
रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत रेल्वेच्या छतावर, इंजिनवर, पायऱ्यांवर किंवा दरवाजात उभे राहून प्रवास करण्यास सक्त मनाई आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी समज देऊनही जर एखादी व्यक्ती असा प्रवास करत असेल, तर त्या व्यक्तींवर कारवाई करून त्यास ५०० रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. दंड भरला नाही तर तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
“पुणे रेल्वे विभाग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. लटकत किंवा पायऱ्यांवर प्रवास करणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे, यावर अंकुश ठेवण्यासाठी भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनी दरवाजात बसून अथवा लटकत प्रवास करू नये. सुरक्षित प्रवासाच्या नियमांचे पालन करावे.” – हेमंतकुमार बेहरा
जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग.





