Pune Crime : गुलटेकडीतील दोन हॉटेलचालक अडचणीत; कामगारांची माहिती पोलिसांना न दिल्याने गुन्हे दाखल
Pune Crime : पुण्यातील गुलटेकडी परिसरातील दोन हॉटेलचालकांविरुद्ध कामगारांची चारित्र्यविषयक माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

Pune Crime : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्यविषयक माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक असतानाही पोलिसांना माहिती न दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरातील दोन हॉटेलचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध राहावी आणि त्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करता यावी, यासाठी देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर आहे.
या प्रकरणी हॉटेल नवनाथ ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई विनोद दीपक साळवे यांनी फिर्याद दिली आहे.. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत. दरम्यान, याच स्वरूपाचा दुसरा गुन्हा हॉटेल व्यंकटेश अमृततुल्य ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई युवराज अंकुश राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार संबंधित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्यविषयक माहिती पोलीस ठाण्यात पुरविणे बंधनकारक असतानाही ती माहिती पोलिसांकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित आदेशाचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हॉटेलचालकांना पोलिसांचा इशारा –
शहरातील हॉटेल, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी माहिती मागविण्यात येते. कामगारांची ओळख व चारित्र्यविषयक माहिती पोलिसांकडे उपलब्ध असणे हे कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनचालकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.





