Pune Grand Challenge Tour : आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीसाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; गतिरोधक हटवले, ५२ किमीचे रस्ते होणार गुळगुळीत

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पुणे ग्रॅण्ड चॅलेज टूर (पीजीसीटी) २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात होणार आहे. शहरातील रस्त्यांवरून सायकली धावणार असल्याने रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच चौकांचे देखील रुपडे बदलण्यात येणार आहे. शहरातील ५२ किमीच्या रस्त्यांवरून ही शर्यत धावणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ, आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ व पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात प्रथमच टूर द फॉन्सच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची पुणे ग्रॅण्ड चॅलेज टूर ही बहुपदरी सायकल शर्यत स्पर्धा जानेवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहराचा परिसराचे जागतिक पातळीवर प्रदर्शन होणार आहे. तसेच, क्रीडा पर्यटनाला चालना मिळणार आहे. स्पर्धा चार टप्प्यात तब्बल ४३७ किलोमीटर अंतरावर होणार आहे. त्यातील पहिल्या व चौथ्या टप्प्यातील शर्यत पिंपरी-चिंचवड शहरातील ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरुन जाणार आहे.
स्पर्धा आयोजनाबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २२ ऑगस्ट २०२५ ला पुण्यातील कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. त्यात स्पर्धा होणार्या मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती व सुशोभिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या शहरी दळणवळण, स्थापत्य विभागाकडून आवश्यक ती कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिकेने पेव्हटेक कन्सल्टींग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची सल्लागार म्हणून नियुक्त केली आहे.
महापालिका शहरातील स्पर्धा मार्गावरील रस्ते दुरुस्त करून डांबरीकरण करणार आहे. मार्गावरील गतिरोधक काढण्यात येणार आहेत. लेन मार्किंग करून अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार काम केले जाणार आहे. रस्त्यावरील दुभाजक, विद्युत प्रकाश खांब, बीआरटीचे बॅरिकेट्स व पुलाची रंगरंगोटी केली जाणार आहे. रस्ते व चौकांतील सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच, रोषणाईसाठी विद्युत कामे केली जाणार आहेत. रस्त्याकडेचे गटार व रेलिंगची दुरूस्ती करण्यात येणार आहे.
या रस्त्यांवर रंगणार शर्यतीचा थरार..
औंध येथील राजीव गांधी पुल ते किवळे रस्ता, निगडी येथील भक्ती-शक्ती समहुल शिल्प चौक, सेंट मदर टेरेसा उड्डाण पुल ते काळेवाडी फाटा या मार्गावरून शर्यत जाणार आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते एमआयडीसी भाग, चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाण पुल हा मार्गही आहे. विनोदे वस्ती चौक ते भुमकर चौक ते आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय हा तिसरा मार्ग आहे. स्पाईन रस्ता, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक हा ही मार्ग आहे. शहरातील एकूण ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांवरून शर्यत जाणार आहे.
“टूर द फॉन्सच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची पुणे ग्रॅण्ड चॅलेज टूर सायकल शर्यत पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यात होत आहे. त्यासाठी शर्यत जाणार्या मार्गावरील रस्ते व चौक सुशोभित करण्यात येत आहेत. रस्त्यावरील उंचवटे व गतिरोधक काढून टाकण्यात येणार आहेत. प्रकाश दिव्यांचे काम, कठडे, दुभाजक यांची आकर्षक पद्धतीने रंगरंगोटी केली जाणार आहे.”
– बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग.





