Pune Gramin : लोणीकंदच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका वादग्रस्त कर्मचाऱ्यांचे प्रकार थांबत नसून नागरिकांनी देखील वाहन पडताळणी प्रकरणी शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार पोलीस उपायुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाघोली येथील संदीप संजय मोटे, व संकेत अर्जुन मांढरे यांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लोणीकंद पोलीस ठाण्यातील स्थानिक कर्मचारी स्वप्निल जाधव याने पेरणे फाटा येथे चेक पोस्ट ठिकाणी वाहनाची पडताळणी करताना नागरिकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना दि. 5 नोव्हेंबर रोजी घडली होती. यानंतर देखील संबंधित कर्मचाऱ्याकडून जाणीवपूर्वक बदनामी व मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
याबाबत संबंधित नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद सर्जेराव कुंभार यांची भेट घेऊन देखील त्यांच्यासमोर घडलेल्या घटनेची कैफियत मांडली आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल होत आहे. स्थानिक कर्मचारी असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास दिला जात असताना देखील वरिष्ठांकडून संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलीस आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी शोध पथकातून याच कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली होती. तरी देखील हा कर्मचारी नागरिकांना त्रास देत असल्याने या कर्मचाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.





