Pune Gramin | तळेगाव ढमढेरेच्या विभागणीवर ग्रामस्थांचा संताप ; न्यायासाठी सर्वपक्षीय लढा..

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे – नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आराखड्यात तळेगाव ढमढेरे गावाचे दोन जिल्हा परिषद गटात विभागणी झाल्याने नाराज गावकर्यांनी एकत्र येत शासनाने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्याचा निषेध करत सर्वपक्षीय ग्रामसभा घेतली. यामध्ये गावच्या वतीने एकत्रित हरकत दाखल करून न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी एकत्रित लढण्याचे ठरवले. गावातील तज्ञ व अनुभवी वकिलांची टीम तयार करून हरकत दाखल करण्यात आली होती. बुधवार (दि.९) रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी पूर्ण झाली असून आता सुनावणीच्या निकालाकडे नागरिकांचे व इच्छूक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
तळेगाव ढमढेरे प्रारूप आराखड्यात दोन गटात विभागल्याने दोन्ही गटातील व दोन्ही गणातील इच्छूक उमेदवार निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रारूप आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे प्रभाग क्रमांक एक हा सणसवाडी जिल्हा परिषद गटाला तर तळेगाव ढमढेरे प्रभाग क्रमांक दोन ते प्रभाग क्रमांक सहा हे शिक्रापूर जिल्हा परिषद गटाला जोडले होते. विशेष म्हणजे या प्रारूप आराखड्यातून तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट हा नाव नामशेष झाले असून जिल्हा परिषद स्थापनेपासून तळेगाव ढमढेरे हा स्वतंत्र जिल्हा परिषद गट अस्तित्वात होता तर स्थानिक मतदार असलेले तळेगाव ढमढेरे हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गटाला नावच नसल्याने येथील ग्रामस्थ प्रशासनाच्या धोरणावर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
एकीकडे शासन, प्रशासन गावात विकासाची गंगा वाहावी यासाठी गावची एकरूपता टिकावी गाव एकसंघ राहाव म्हणून आदर्श गाव, आर.आर. (आबा) सुंदर गाव पुरस्कार, नॅशनल पंचायत अवार्ड, यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्कार, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान असे विविध उपक्रम राबविताना पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे हेच शासन प्रशासन एका गावाची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी करून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.तळेगाव ढमढेरे संपूर्ण गाव हे एकाच जिल्हा परिषद गटात असावे व या गटाचे नाव पूर्वीप्रमाणे तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट असेच असावे अशी मागणी गावकरी करत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे .
गटरचनेच्या गोंधळाने इच्छुकांच्या तोफा थंडावल्या..
तळेगाव ढमढेरे गाव दोन विभागल्याने इच्छूक उमेदवारांची गोची झाल्याने शिक्रापूर जिल्हा परिषद गट व सणसवाडी जिल्हा परिषद गटातील इच्छूक उमेदवारांच्या तोफा थंडावलेल्या पहायला मिळत आहे. गावचेच दोन गटात विभाजन झाल्याने सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असूनही गावातील इच्छूक उमेदवारांनी तलवारी अद्याप मेणातच पहायला मिळत आहेत. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटाचा निकाल कसा येतो त्यावर या दोन्ही जिल्हा परिषद गटातील इच्छुकांचे भविष्य अवलंबून आहे .





