Pune Gramin | जुन्नरमध्ये विनापरवाना ढाब्यांचा सुळसुळाट; अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर

प्रभात वृत्तसेवा
ओझर – जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये व रस्त्यालगत अनेक छोटे-मोठे ढाबे विनापरवाना चालत आहेत. अशा हॉटेल व ढाब्यांमधील अन्न खाऊन विषबाधा झाल्यास याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. येथील पदार्थांची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तालुक्यात मोठी लोकसंख्या असणारी अनेक गावे असून यातील बरीचशी गावे महामार्गालगत आहेत. यामुळेच हॉटेल्स व ढाब्यांचा व्यवसाय चालत आहेत.
हा व्यवसाय चालू करण्यासाठी अन्न-औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे आवश्यक असते. परंतु, याची पर्वा न करता हे व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याचे दिसून येते. यातील काही व्यावसायिकांकडे परवाना आहे. मात्र, तो परवाना नूतनीकरण न केल्याचे दिसते. बहुंताश हॉटेल्स व ढाब्यांवर कमालीची अस्वच्छता असून शिळे अन्न दिले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. येथील पाणी पिण्यायोग्य आहे का नाही? याबाबतही संभ्रम आहे. सगळीकडे पावसाळी दिवस चालू असून याच दिवसात मलेरिया, कावीळ, टॉयफॉईड, डायरिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव असतो.
व्यवसायाची जागा बिनशेती असावी असा नियम आहे. मात्र, बरेचशी हॉटेल्स व ढाबे शेती असलेल्या जागेत सुरू आहेत. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत अशा जागेत चालणाऱ्या व्यवसायांची तपासणी होणे आवश्यक आहे. अन्न-औषध प्रशासन विभागामार्फत विनापरवाना चालणाऱ्या हॉटल्स व ढाब्यांमधील अन्नाची व पाण्याची तपासणी होणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एस.टी स्थानकांत असणाऱ्या कॅन्टीनमध्ये तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे.




