शिरूर : शिरूर तालुक्यातील तब्बल जवळपास ४० वर्षे बंद असलेले कवठे येमाई – पांडव करी गणेशनगर ते फाकटे आणि निमगाव म्हाळुंगी – कासारी हे दोन महत्त्वाचे रस्ते अखेर शिरूर तहसिल कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांमुळे खुले झाले आहेत. या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. कवठे येमाई येथील पांडव करी गणेशनगर ते फाकटे हा १.५ किमी लांबीचा पाणंद रस्ता जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण आणि अडथळ्यांमुळे बंद होता. महसूल प्रशासनाने विशेष पुढाकार घेत अखेर हा रस्ता खुला केला आहे. तसेच, निमगाव म्हाळुंगी ते कासारी हा ५ किमी लांबीचा शिवरस्ता तब्बल २५ वर्षांपासून बंद होता. प्रशासनाने आतापर्यंत २ किमी अंतराचा रस्ता मोकळा केला असून उर्वरित ३ किमी लवकरच पूर्ण केला जाणार आहे. रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सोय निर्माण झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात महसूल प्रशासनाने मोठी भूमिका बजावली आहे. या उपक्रमात मंडल अधिकारी माधुरी बागले, मंडल अधिकारी तावरे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी रामदास आरदवाड, मनिषा राऊत, मनिषा भालेराव, आबासाहेब रूके, संतोष पोटावळे यांसह ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. लवकरच या भागातील सर्व प्रमुख रस्ते खुले होतील, अशी आशा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. “शासनाच्या आदेशानुसार व प्रांत अधिकारी पुनम अहिरे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज गतीने सुरू असून, उर्वरित शिवरस्ते, पाणंद रस्तेही ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच खुले करण्यात येतील.” – (माधुरी बागले, मंडल अधिकारी मलठण, तळेगाव ढमढेरे)