Pune Gramin : भोरच्या प्रवेशद्वारावरील पूल पहिल्याच पावसात जलमय; नागरिकांचे हाल सुरूच!

भोर – भोर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेला प्रमुख पूल पहिल्याच पावसात जलमय झाला असून, नागरिकांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते, मात्र यावर उपाय करण्याऐवजी प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत.
कापूरहोळ-भोर रस्ता हा सध्या अर्धवट स्थितीत आहे. रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सोडल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाश्यांना दररोज हाल सहन करावे लागत आहेत. रस्त्यावर खड्डे, मातीचे ढिगारे व अपूर्ण पक्कीकरण यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या भागातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आमदार व स्थानिक प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती असेल तर पुढील काळात काय होईल, असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने पूल व रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.





