Pune Gramin : रस्ता नाही, उपचारही नाही.! खोपीतील वस्तीचा वनवास; रस्त्याअभावी आणखी एक बळी
भोर तालुक्यातील खोपी येथील कचरे वस्ती-जाणकर वस्तीला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नसल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Pune Gramin : भोर तालुक्यातील खोपी येथील कचरे वस्ती-जाणकर वस्तीला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नसल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याअभावी आजारी व्यक्तींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवणेही कठीण होत असून, या गंभीर समस्येमुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना बांधा-बांधातून, चिखलातून तसेच दगड-गोट्यांमधून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट होत असून, रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वेळेत वाहन पोहोचत नसल्याने अत्यवस्थ रुग्णांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे.
वर्षानुवर्षे मागणी करूनही रस्ता नाहीच!
वस्तीला कायमस्वरूपी रस्ता मिळावा, यासाठी नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या आजही कायम आहे. रस्त्याअभावी शिक्षण, आरोग्य, शेती आणि दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.
एका बाजूला विकासाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत रस्त्यासाठी नागरिकांची फरफट, अशी अवस्था खोपीतील कचरे वस्ती-जाणकर वस्तीची झाली आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही परिस्थिती तातडीने बदलावी आणि वस्तीला कायमस्वरूपी पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आणखी एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.





