Pune Gramin : झाड रस्त्यात पडूनही दिवसभर कारवाई नाही; PWD चा कानाडोळा

कुरुंगवडी : घोरेपडळ या रस्त्यावर आज सकाळी सुमारे आठच्या सुमारास एक मोठे बाभळीचे झाड कोसळून निम्मा रस्ता अडवून पडले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे झाड रस्त्याच्या मधोमध पडून असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) याकडून कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुपारी तीनच्या सुमारास अभिषेक वैराट व स्थानिक नागरिक गजानन बापू पडवळ यांनी संबंधित अधिकारी प्रकाश गाडे यांना या घटनेची माहिती व्हिडिओद्वारे दाखवली. विशेष म्हणजे हेच अधिकारी सकाळी त्या रस्त्यानेच वेल्हे कार्यालयात आले होते, तरीसुद्धा त्यांनी झाड काढण्याची तसदी घेतली नव्हती. याबाबत अभिषेक वैराठ यांनी विचारणा केल्यानंतर गाडे यांनी “झाड काढण्यात आलेले आहे” असा दावा केला. मात्र संध्याकाळी सहा वाजता प्रत्यक्ष पाहणी केल्यावर ते झाड त्याच अवस्थेत रस्त्यात पडलेले दिसले.
यानंतर अभिषेक वैराट यांनी उपअभियंता मोकाशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी कॉल रिसीव केला नाही. यावरून PWD विभागाची निष्काळजी वृत्ती उघड झाली आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना प्रकाश गाडे यांनी सांगितले की, “मी सकाळी जेसीबीवाल्याला झाड काढायला सांगितले होते. परत विचारून कळवतो. जेसीबीवाला दीड तासात झाड काढेल.”
फक्त झाडाचा मुद्दा नव्हे तर चेलाडी–राजगड रस्त्याचे दुरुस्तीचे कामही केवळ दोन दिवसांत पुन्हा खड्डेमय झाले आहे. यामुळे दुरुस्तीचा दर्जा आणि निधीच्या वापराबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. अभिषेक वैराट यांनी स्पष्ट आरोप केला की, “सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांच्या सुरक्षेची काळजी न घेता फक्त निधी लाटण्याचे काम करत आहे.” नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून, “जर संबंधित मंत्र्यांनी आणि स्थानिक आमदार, पालकमंत्र्यांनी या प्रकरणी वेळेत लक्ष न दिल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल” असा इशारा देण्यात आला आहे.





