Pune gramin : मांजरवाडी गावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरात नवरात्र महोत्सव

ओझर : जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या ठिकाणी गावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीचा परंपरेप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात याठिकाणी ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
जुने जाणकारांच्या सांगण्यानुसार मांजरवाडीच्या शिवेवर १९११ च्या दरम्यान मुक्ताई देवीचे मंदिर होते. खोडद आणि मांजरवाडीच्या विभाजनानंतर या मांजरवाडीचे गावात रूपांतर झाले. खोडद गाव हे मीना नदीच्या पलीकडे असल्याने आपल्या वाडीतही देवीचे मंदिर असावे असे या वाडीतील ग्रामस्थांना वाटू लागले.
या अनुषंगाने गावकऱ्यांनी शिवेवरील मुक्ताई देवीचा तांदळा मांजरवाडीत आणून त्याची स्थापना केली. देवीला निवारा म्हणून मंदिर बांधण्याचा विचार पुढे आला व त्यानुसार मंदिर उभारणीच्या कार्याला वेगाने सुरुवात झाली.
अखेर मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तांदळा व देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या देवीला अनेक वर्षे मुक्ताई म्हणून संबोधले जात असे, मात्र नंतर काळाच्या ओघात जगदंबा बोलण्याचा प्रघात पडला.
नवरात्रीमध्ये जगदंबेच्या मंदिरात घट स्थापना केली जाते. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. काकड आरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे मांजरवाडी गावातील प्रत्येकासाठी चैतन्याचा एक सोहळाच असतो.
विशेष म्हणजे संपूर्ण गावातील महिला – भगिनी नऊ दिवस मोठ्या श्रद्धेने जगदंबेची आराधना करतात. नऊ दिवस रोज पहाटे आणि सायंकाळी गावातील महिला व ग्रामस्थ देवीच्या आरतीसाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित असतात. गावातील प्रत्येक व्यक्ती सकाळी देवीचे दर्शन घेऊनच पुढच्या कामाला सुरुवात करतात.गावकऱ्यांची एवढी दृढ आणि अपार श्रद्धा या देवीवर आहे.





