Pune Gramin | जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा दहशतवाद

प्रभात वृत्तसेवा
बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचवाडी येथील घोडके वस्तीवर बिबट्यांच्या सतत वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याकडे वारंवार तक्रारी करूनही पिंजरा लावण्यात कोणतीही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.या प्रकरणी स्थानिक रहिवासी सागर जाधव यांनी सांगितले की, बिबट्याने आमच्या बंगल्याच्या सात फूट उंच भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला आणि दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीच्या हल्ल्यात आमचा कुत्रा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या प्राणासाठी तब्बल 40 ते 50 हजार रुपये खर्च करून उपचार करावे लागले. दुसर्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध असून त्यात बिबट्या स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने दोन्ही कुत्रे जाळीत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला, असे त्यांनी सांगितले. या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्यांचा वावर कायम असतो.
परिणामी, नागरिकांना रात्रीच नव्हे तर दिवसाही घराबाहेर पडणे भयावह वाटत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोक रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात, अशा परिस्थितीत गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरातील एखाद्या सदस्याचा जीव गमावल्याशिवाय वनखाते जागे होणार नाही का? असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांनी वनखात्याने तातडीने पिंजरे लावून नागरिकांचा जीवितहानीचा धोका टाळावा, अशी मागणी केली आहे.




