Pune Gramin : श्रीरामपूर कोर्टात वकिलावर हल्ला; राजगुरुनगरमध्ये वकिलांचा संतप्त मोर्चा

राजगुरुनगर : श्रीरामपूर येथील न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या निषेधार्थ राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत निवेदन देण्यात आले.
बुधवारी (दि. ३०) श्रीरामपूर न्यायालयात ॲड दिलीप दत्तात्रय औताडे (वय ४४) यांच्यावर सुनावणी दरम्यान न्यायाधीशांच्या समोर आरोपीने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, वकिलावर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करावी, या मागणीसाठी राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
श्रीरामपुर घटनेबाबत वकिलांनी संतप्त भावना व्यक्त करत खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले. यावेळी वकील संरक्षण कायदा आणून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चा मोठ्या संख्येने वकील बांधव सहभागी झाले होते.





