Pune Gramin | खडकवासला भूमिगत कालव्याला केंद्राचा हिरवा कंदील

प्रभात वृत्तसेवा
पारगाव – खडकवासला- फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचा ‘हिरवा कंदील’ मिळाला असल्याचे दौंड चे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. या महत्वाकांक्षी २२०० कोटींच्या योजनेमुळे सिंचनक्षेत्राची वाढ होणार असून पाणी प्रदूषण सुद्धा नियंत्रण होणार आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित २८ किलोमीटर भूमिगत बंदनळी (कालवा) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. प्रकल्पासंदर्भात शनिवार (दि.३०) कार्यकारी अभियंता योगेश सावंत आणि मेगा इंजिनिअर्सचे व्यवस्थापक राजा यांच्या उपस्थितीत आमदार राहुल कुल यांनी चर्चा केली. प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि समन्वयाने पूर्ण करण्याबाबत बैठकीत स्पष्ट निर्देश देण्यात आले.
सुमारे २२०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पास राज्य सरकार, केंद्र शासन तसेच संबंधित तांत्रिक संस्थांची सर्व मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘हिरवा कंदील’ दाखविल्यामुळे आता योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू होण्यास कोणताही प्रशासकीय अडथळा उरलेला नसल्याचे राहूल कुल यांनी सांगितले.
प्रकल्पाद्वारे खडकवासला धरणातील पाणी भूमिगत बंदनळीमार्फत थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक उघड्या कालव्यांमधून होणारी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात रोखली जाईल. पाण्याची बचत होईल. प्रशासनाच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे दौंड तालुक्यासह ग्रामीण भागातील सिंचनक्षेत्र लक्षणीयरीत्या वाढेल. शेतकऱ्यांसाठी ३ टीएमसी हंगामी पाणी उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढून उत्पन्नात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आमदार कुल यांनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांच्या मतानुसार….
अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकाच धाग्यावर काम करणे आवश्यक आहे. समन्वय साधून दर्जेदार पद्धतीने काम केल्यास हा प्रकल्प जलसंपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल. खडकवासला धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्यासाठी भूमिगत कालवा हा उपाय ठरत आहे. या माध्यमातून शेती, ग्रामीण विकास आणि शहरी जलपुरवठा या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.




