Pune Gramin | सोयाबीनवर किडीचा हल्ला! ; खेड तालुक्यातील शेतकरी हतबल

प्रभात वृत्तसेवा
चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर हुमणी व लाल किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकर्यांनी किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध फवारणीची लगबग सुरू केली आहे.यंदा मे महिन्यातच पावसाने दमदार सुरुवात केली असली, तरी पेरणीची कामे उशिरा पार पडली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खुरपणीची गडबड सुरू होती; मात्र गेल्या आठ दिवसांपासून कडक उन्हासोबत सकाळ-संध्याकाळ ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
या हवामानातील बदलामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून सोयाबीन पिक पिवळसर पडू लागले आहे. शेतकरीवर्गात चिंता वाढली असून तातडीने फवारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामानातील अनिश्चितता व किडीचा फैलाव यामुळे हंगामातील उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.




