Pune Gramin | राज्यपालांचे पितृत्व, माईंच्या लेकरांचे प्रेम ; राजभवनात राखीचा अनोखा सोहळा..

प्रभात वृत्तसेवा
दिवे – आई विना वाढलेल्या, पण ममताशून्य कधीच न झालेल्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन मधील निरागस मुलींनी रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर एक अनोखी राखी आपल्या ‘राज्यपिता’च्या हातात बांधली. आणि राजभवनात क्षणभर जग थांबल्यासारखं वाटलं. “राज्यपालांच पितृत्व आणि लेकींच प्रेम” असा हृदयस्पर्शी अनुभव माईंच्या लेकींनी राज भवनात अनुभवला.पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेमळ सानिध्यात घडलेल्या या मुली, ज्यांनी जीवनात अडथळे पाहिले, पण हार मानली नाही, त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली.
ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर प्रत्येक राखी मागे होती एक भावना “आम्हालाही कुणीतरी आहे. जे आमचं असतं.” राज्यपालांनीही मुलींना केवळ पाहुण्या म्हणून नाही, तर आपल्याच घरातल्या लेकीप्रमाणे प्रेमाने गळामिळवून घेतलं. त्यांनी प्रत्येकाच्या डोळ्यांत डोकावून तिच्या मनातली स्वप्नं जाणून घेतली, तिच्या हातात आश्वासक शब्दांची राखी बांधली.”तुम्ही एकट्या नाही आहात, मी तुमच्यासोबत आहे,” हे शब्द तेव्हा त्यांच्या तोंडून नाही, तर डोळ्यांतून उमटत होते. सिंधुताईंच्या कार्याची आणि त्यागाची सावली ज्या लेकींच्या अंगावर असते, त्या लेकी इतक्या गोड, निरागस आणि आत्मविश्वासाने भरलेल्या असतात, हे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. राजभवनाच्या भिंतींना आज लेकींच्या हसण्याचा गोड नाद ऐकू येत होता, आणि राज्यपालांच्या मृदू स्पर्शाने त्या लेकींच्या हृदयात वडिलांची उब खोलवर मुरत होती.
हा सोहळा म्हणजे केवळ राखीचा नव्हता तो माणुसकीचा, आपुलकीचा, आणि प्रेमाच्या अमर बंधाचा होता.राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या पुरंदर तालुक्यातील ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, मुंबई महानगर पालिका शाळेतील विद्यार्थिनी, मुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्य, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जिल्हा रायगड येथील विद्यार्थींनी, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) येथील दृष्टिहीन विद्यार्थिनी प्रतीक्षा महिला बचत गटातील महिला यांचा समावेश होता. भारत विकास परिषद माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी व बांधवांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.
याप्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, खासगी सचिव अर्चना गायकवाड, राज भवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, ममता बाल सदनचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, माईंच्या लेकी कु. साक्षी, कु. अनिता, कु. जान्हवी, कु. पावनी आदि उपस्थित होते. राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या.




