Pune Gramin : श्री क्षेत्र ओझर येथे प्रथमच अंध व्यक्तींचा शाही सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे शनिवार, १४ जून २०२५ रोजी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील पहिला अंध व्यक्तींचा शाही सामुदायिक विवाह सोहळा अश्वमेघ युवा मंचचे संस्थापक आणि भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून यशस्वीपणे पार पडला.या सोहळ्याची सुरुवात पारंपरिक रीतिरिवाजांनुसार मांडवदहाळे आणि साखरपुड्याच्या मिरवणुकीने झाली.
ओझरच्या लेझीम पथकाने पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक सजवली, तर महिला भजन मंडळ आणि ब्रास बँडने मिरवणुकीत रंग भरला. गणेश पूजन श्री क्षेत्र ओझरच्या सर्व संस्थांच्या आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील पाच अंध वर-वधूंनी सहभाग घेतला. दुपारच्या सत्रात भोजन आणि हळदीचा समारंभ पार पडला. त्यानंतर वर-वधूंची मिरवणूक विंटेज कार आणि पाच लक्झरी कार्सच्या शाही थाटात निघाली. झांज पथक, ताशा पथक, ब्रास बँड आणि महिला लेझीम पथकाने मिरवणुकीला भव्यता आणली.
या प्रसंगी राज्यातील सामाजिक, सांप्रदायिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिले. अश्वमेघ युवा मंचतर्फे कन्यादानाच्या स्वरूपात प्रत्येक वधूस सोन्याचे मंगळसूत्र, वर-वधूस प्रत्येकी तीन पोशाख आणि देवघरापासून संपूर्ण संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या सोहळ्यास श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे अध्यक्ष योगी निरंजननाथ गुरुशांतिनाथ, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर, आमदार महेश लांडगे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, भाजपा नेत्या आशाताई बुचके, ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांच्यासह अनेक मान्यवर, ५०० अंध विद्यार्थी, अश्वमेघ परिवार, गणेश कवडे मित्र परिवार आणि ओझर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक पांडुरंग कवडे, सुभाष दळवी आणि गणेश मोढवे यांनी केले.





