Pune Gramin | भिमाशंकर-शिवनेरी-नाणेघाट विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – भिमाशंकर ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिमाशंकरसह शिवनेरी आणि नाणेघाट परिसराच्या समग्र पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली आहे.
शिवनेरी किल्ला अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट झाला आहे. भिमाशंकरच्या रांगेतील निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, या परिसराचे नियोजनबद्ध संवर्धन आवश्यक आहे, असे सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी सांगितले. यासाठी भिमाशंकर – शिवनेरी – नाणेघाट संवर्धन प्राधिकरण स्थापन करून या कामाची जबाबदारी व्ही. राधा यांच्याकडे सोपवावी, असे त्यांनी सुचवले.
पर्यटन सचिव अतुल पाटणे यांच्याकडे या मागणीचा प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जात असून, त्याला प्राधिकरणाचे स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.
बारा किल्ल्यांच्या शिवतीर्थ यात्रेची मागणी..
सह्याद्री संस्थेने युनेस्को मान्यताप्राप्त बारा किल्ल्यांची शिवतीर्थ यात्रा सुरू करण्याची मागणी केली असून, जुन्नरमधील नव्याने बांधले जाणारे बसस्थानक हे वारसास्थळात घ्यावे. यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या दोन्ही मागण्यांवर संस्थेचा ठाम आग्रह असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.




