Bullock Cart Race Case | जिल्ह्यातील बड्या नेत्यांना अटक वॉरंट

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – बैलगाडा शर्यत बंदी विरोधात 2017 साली चाकण येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रोखणार्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांना खेड न्यायालयाने अटक वारंट जारी केले होते. आज गुरुवारी (दि. 14) खेड न्यायालयात या गुन्ह्यातील बड्या नेत्यांनी हजर राहून अटक वॉरंट रद्द करण्यासाठी जामीन दिला.चाकण येथे सन 2017 मध्ये चौकात बैलगाडा शर्यत बंदी विरोधात कोणतीही परवानगी न घेता रस्ता रोको आंदोलन केले होते.
या सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी असलेल्या माजी मंत्री संजय बाळा भेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दिगंबर बाळोबा भेगडे, श्रीरंग बारणे, तत्कालीन आमदार दिलीप मोहिते, महेश लांडगे, शरद सोनवणे, स्व. सुरेश गोरे यांच्यासह अरुण गिरे, राम गावडे, महेश शेवकरी, कैलास गाळव, रामकृष्ण टाकळकर, विकास चव्हाण, नितीन शेवाळे, विकास नायकवडी, प्रकाश वाडेकर, अण्णासाहेब भेगडे, गणेश सांडभोर, गणेश कावळे, परमेश्वर चौधरी, नवनाथ होले, बाळासाहेब आरुडे, प्रकाश सोपान वाडेकर, आनंद चंद्रचूड, आनंद मोहिते, जयसिंग एरंडे, राजू जवळेकर, राम मधुकर गावडे, राहुल गोरे, देवराम लांडे या 31 जणांसह अनेक आंदोलकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी चाकण पोलिसांनी चार्जशीट खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठवले होते. सुरुवातीला या गुन्ह्यातील सर्व जण कोर्टातील तारखेला हजर राहत होते. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. सरकारने बैलगाडा शर्यत आंदोलन करणार्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील अशी घोषणा केली. या घोषणेवर आधारित बर्याचशा नेत्यांनी या सुनावणीच्या तारखांना जाणे टाळले होते.
अटक वारंटबाबत आज (दि.14) खेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. सी. गुप्ता यांच्यापुढे सुनावणी होती. हातातले नियोजित काम किंवा उपक्रम सोडून हे नेतेमंडळी खेड न्यायालयात हजर झाले. यातील सुरेश गोरे आणि इतर एक जण मयत झाले असून चार जणांनी मागील आठवड्यात अटक वारंट जारी झाल्यानंतर खेड न्यायालयात हजर राहून जामीनावर सुटका करून घेतली होती. उर्वरित 25 जणांनी आज न्यायालयात हजर राहून अटक वारंटवर जामीन घेतला.
अटक वॉरंट आणि राजकीय खळबळ..
गैरहजेरीमुळे खेड न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काही आरोपींनी मागील आठवड्यातच हजर राहून जामीन मिळवला, तर उर्वरित 25 जण गुरुवारी न्यायालयात हजर झाले. माजी मंत्री संजय बाळा भेगडे, माजी खासदार आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार शरद सोनवणे यांच्यासह इतर नेतेमंडळींच्या उपस्थितीमुळे न्यायालय परिसरात समर्थकांची मोठी गर्दी झाली.
बैलगाडा शर्यत हा राज्यातील जनतेच्या भावनांचा विषय होता. या आंदोलनामुळे सरकारचा तोटा झाला नाही, फक्त वाहतूक कोंडी झाली. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली असून, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळेच आम्ही तारखांना गैरहजर राहिलो. अटक वॉरंटानंतर सर्वजण हजर राहून जामीन मिळवला.
-दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड.




