वाल्हे – ग्रायवहेटीनी पाईपलाईन नेल्यास पाईपलाईनमध्ये प्रेशर राहणार नसल्याने पाणी पुढे जाणार नाही, तुम्ही तुमचा हट्ट सोडा इंजिनिअरिंगच्या टिमने डिझाईन केले असून, पाईपलाईन कुठूनही गेली तरी, लाभक्षेत्रातील सर्व लागवड योग्य जमिनीला पाणी मिळेल. ज्या ठिकाणी बूस्टर पंपांची गरज असेल त्याच ठिकाणी बूस्टर पंप बसविण्यात येतील. एका गावासाठी संपूर्ण तालुक्याची पाईपलाईन बदलणार नसून १९९३ च्या सर्व्हेनुसार पाईपलाईन होणार नाही. असे आमदार विजय शिवतारे म्हणाले. वागदरवाडी (ता.पुरंदर) येथील गुंजवणी प्रकल्पाबाबत वागदरवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात व वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतींच्या सभागृहामध्ये शनिवार (दि.१४) आमदार विजय शिवतारे नीरा-देवधर प्रकल्प सांगवी विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडूलकर, गुंजवणी प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता नयन गिरमे यांनी लाभधारकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे बोलत होते. यावेळी, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, उषा पवार, डि.एन.पवार, कांतीलाल भुजबळ, सुनील कदम, पोपट पवार, बाळासाहेब राऊत, ॲड.फत्तेसिंह पवार, राजसिंह पवार, सचिन पवार, मधुकर पवार, विठ्ठल पवार, सुर्यकांत पवार, सचिन देशपांडे, अतिष जगताप, उमेश पवार, महेंद्र पवार, संभाजी पवार, राहुल यादव, सागर भुजबळ, अथर्व पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. मागील काही दिवसांपूर्वी गुंजवणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी वर्गाला विश्वासात न घेता मर्जीप्रमाणे प्रकल्पाचे काम सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे रविवार (दि.२५) मे रोजी वाल्हे व परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत गुंजवणी प्रकल्पांच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम बंद पाडून, जुन्या १९९३ च्या सर्व्हेनुसारच काम सुरु करण्याची मागणी देखील केली होती. मात्र, यानंतर वाल्हे व परिसरातील विशिष्ठ गटाने वाल्हे पोलीस दुरक्षेञात तसेच एल.एन.टी.कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन देवून पुन्हा गुंजवणी प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, शेतकरीवर्गाच्या म्हणण्यानुसार, सद्यःस्थितीत सुरू असलेले काम चुकीच्या मार्गाने पुन्हा सुरु झाल्याने वाल्हे सह परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत हरणीच्या घाटाजवळील गुंजवणी प्रकल्पाचे काम, दुसर्यांदा गुरूवार (दि.५) रोजी बंद पाडले होते. यासंदर्भात आमदार विजय शिवतारे व गुंजवणी प्रकल्पातील अधिकारीवर्ग व शेतकरीवर्ग यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान,सध्या सुरू असलेले काम १९९३ च्या जुन्या सर्वेक्षणानुसार होत नाहीये तसेच ग्रामस्थांनी हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आणि यामुळे बापसाईवस्ती, वागदरवाडी आदी भागांना कोणताही फायदा होणार नसल्याचा आरोप केला होता. यावर जलसंपदा विभागाने स्पष्टीकरण दिले की, १९९३ चे सर्वेक्षण हे पारंपारिक खुल्या कालव्यांसाठी होते. मात्र, २०१६ मध्ये भूसंपादनाच्या अडचणी आणि जास्त खर्चामुळे बंद नलिका प्रणाली स्वीकारण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये याच बंद नलिका वितरण प्रणालीसह प्रकल्पाला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सध्याचे काम या सुधारित मान्यतेनुसार तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सुरू आहे. तसेच सुधारित संकल्पनामध्ये वाल्हे परिसरातील दुष्काळग्रस्त भागांचा (उदा. बापसायवस्ती, वागदरवाडी इत्यादी) समावेश करण्यात आला आहे आणि या भागांसाठी स्वतंत्र बूस्टर पंपाद्वारे पाणी देण्याची तरतूद तसेच स्थानिक तलाव भरण्याची तरतूद देखील समाविष्ट करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. दरम्यान, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरीवर्गानी यावेळी मागणी केली की, जुन्या १९९३ सर्वेनुसार काम करणार असेल तरच काम सरू करावे;अन्यथा काम सुरू करू नये. “शेतकऱ्यांच्या हितासाठी, गुंजवणी बंदिस्त पाईपलाईनचा प्रकल्प होणे गरजेचे असून, १९९३ च्या सर्व्हेनुसार खुल्या प्रवाही कालव्यानुसार मुख्य पाईपलाईन, वाल्हेच्या पश्चिम-उत्तर कडील परिसरासह बापसाईवस्ती, वागदरवाडी,राख,सुकलवाडीसह गावापर्यंतची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पावित्रा येथील सर्व शेतकरीवर्गाने घेतला असून, जर संबंधितांकडून पोलीस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व शेतकरी मिळून हे काम बंद पाडू; प्रसंगी आम्ही पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या खाण्याचीही तयारी आहे.संबंधित विभागाकडून शेतकरीवर्गाच्या हिताचा निर्णय घेऊन,वाल्हे व परिसरातील लागवड योग्य क्षेत्र ओलीताखाली आल्याशिवाय हे काम सुरू करू नये”. – बाळासाहेब राऊत, शेतकरी वाल्हे.