Pune Gramin : विघ्नहर चे संचालक ‘पंकज वामन’ यांचे अपघाती निधन

नारायणगाव : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व प्रगतशील शेतकरी पंकज शिवाजी वामन (वय-३९) यांचे ट्रॅक्टर अपघातात गुरुवारी (दि.२९) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने विघ्नहर सहकारी साखर कारखाना परिवारावर, बल्लाळवाडी व ओतूर परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
बल्लाळवाडी (ता.जुन्नर) येथे पंकज वामन आपल्या शेतात काम करीत असताना विहिरीजवळ असलेल्या उतारावर ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. ट्रॅक्टरच्या शीटच्या मागील बाजूस केबल वायर ठेवण्यात आली होती. पंकज वामन केबल वायर काढण्यासाठी गेले असता अनावधानाने ट्रॅक्टरचा हॅन्ड ब्रेक निघाला आणि ट्रॅक्टर विहिरीच्या बाजूने असलेल्या उताराने धावू लागला.
त्याच दरम्यान ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेला. पंकज वामन यांना तात्काळ आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताठे यांनी दिली.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मोठा भाऊ,भावजय व वृद्ध आई-वडील आहेत. त्यांचे मुळगाव पिंपळवंडी (ता.जुन्नर) असून शेतीमुळे बल्लाळवाडी (ता.जुन्नर) येथे स्थायिक झाले आहेत. पंकज वामन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक असून प्रगतशील शेतकरी असल्याने ओतुर गटातून निवडून आले होते.
प्रियंका शेळके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर
पंकज शिवाजी वामन हे उदयनमुख युवा नेतृत्व होते. प्रगतशील शेतकरी असल्याने विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला त्यांचा दरवर्षी ५ हजार टन ऊस गाळपासाठी दिला जात होता. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून एक युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त केली.





