फुरसुंगी – उरुळी देवाची येथील सर्व्हे नं. 151 (खंडोबामाळ) येथील गायरान जागेवर शासकीय धान्य गोदामाचे काम सुरू करण्यात आले होते. या धान्य गोदामाला नागरिकांचा विरोध असून आज एकत्र येत धान्य गोदामाचे काम नागरिकांनी बंद पाडले. ज्या ठिकाणी धान्य गोदामाचे काम सुरू करण्यात आले आहे त्याच्या बाजुलाच जिल्हा परिषद शाळा व समता विद्यालय अशा दोन शाळा असून आजुबाजुला मोठ्या सोसायटी देखील असल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होणार असल्याने धान्य गोदामाला पहिल्यापासूनच नागरिक विरोध करीत आहेत. पुणे-सासवड रस्त्यावरून उरुळी देवाची गावात येण्यासाठी रस्ता देखील अरुंद असून या रस्त्यावर भाजीमंडई चौकात आधीच दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच धान्य गोदामात येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्यानेही या कामाला विरोध करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सदर ठिकाणी शासकीय रुग्णालय करण्यात यावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी असून राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. तसेच, त्याच बाजुला तलाठी कार्यालयासाठी जागा आरक्षित आहे. मोकळ्या जागेत गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून रुग्णालय, गार्डन तसेच यात्रेसाठी कुस्त्यांचा आखाडा अशा प्रकारे प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा, असा ठराव ग्रामसभेतही झालेला आहे. परंतु, प्रशासनाने नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर या जागेवर धान्य गोदाम उभारण्याचा घाट घातला आहे. सदर गोदामासाठी ही जागा योग्य नसतानाही हे काम येथील गावावर लादले जात आहे. या अगोदर देखील उरुळी देवाची येथील गायरान जमीनीवर कचरा डेपो केल्याने नागरिकांना यातना भोगाव्या लागल्या आहेत. आता. धान्य गोदाम करून पुन्हा तेच हाल उरुळी देवाची नागरिकांचे करू नका, अशी विनंती नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. यावेळी दिलीप भाडळे, राजीव भाडळे, संतोष भाडळे, तात्यासाहेब भाडळे, रमेश भाडळे, चंदुलाल ओसवाल, सोमनाथ कऱ्हे, शंकर भाडळे, नाथा शिंदे, पांडुरंग गोरे, उमेश भाडळे, संजय ओसवाल, गुरुदास राऊत, नानासाहेब झांबरे, राजकुमार छापरवाला, मयुर परमाळे, बाबु बोरकर, देविदास राऊत उपस्थित होते.