Pune: लोकअदालतीत वाहतूक दंड भरण्याची सुवर्णसंधी; १० ते १३ सप्टेंबरदरम्यान पुणेकरांना लाभ

Pune : पुणे, हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणे यासारख्या किरकोळ वाहतूक नियमभंगांवरील प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने हा उपक्रम १० ते १३ सप्टेंबरदरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारील वाहतूक शाखा कार्यालयात राबविण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधारे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या पुढाकारातून प्रलंबित वाहतूक दंड तडजोडीच्या मार्गाने निकाली काढता येणार आहेत. या उपक्रमात प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांचा सहभाग आहे.
सवलतीत भरता येणारे दंड –
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे.
सवलत न मिळणारे गंभीर नियमभंग –
मद्यपान करून वाहन चालविणे, अपघात करून पळ काढणे, निष्काळजी वाहनचालनातून प्राणांतिक अपघात, अल्पवयीन मुलाकडून वाहन चालविणे, अनधिकृत शर्यती, गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर, न्यायालयीन सुनावणी प्रलंबित प्रकरणे, अन्य राज्यातील चलने.
“राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”
– न्या. महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे
“या उपक्रमातून नागरिकांना सवलतीचा लाभ तर मिळेलच, पण वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.”
– न्या. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण





