Pune : कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्या

पुणे : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच, या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही, पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून, त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. पाच धर्तीवर इतर पीडितांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येईल. या कृतीद्वारे या शूर कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्यासोबत उभी आहे, असा विश्वास शासनाने द्यावा, असे खा. सुळे यांचे म्हणणे आहे..
जम्मू-काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील चार जणांसह कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे पुण्याचे रहिवासी मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे. ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून, या दहशवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरिक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाहीही या पत्रातून देण्यात आली आहे.
आपल्या घरातील कर्ते पुरुष अतिरेकी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धिरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. त्यामुळे उपरोक्त विनंती मान्य करावी, असे या पत्रात नमूद केले आहे.





