Pune: शिवाजीनगर न्यायालयासमोर गॅस स्प्रे बाटलीचा स्फोट; दोन पोलीस आणि एक कामगार जखमी

पुणे – शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनसमोर एका वडापावच्या गाडीवर गॅस असलेल्या स्प्रे बाटलीचा स्फोट झाला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि एक गाडीवरील कामगार जखमी झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गाडीवरील कामगार गोविंद अंकुशे, वाकड पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष सोनवणे (३७) आणि निलेश सुभाष दरेकर हे तीघे जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजले आहे. पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाजानिमीत्त शिवाजीनगर न्यायालयात आले होते. यानंतर ते हातगाडीवर चहा घेण्यासाठी थांबले हाते, तेव्हा सिगरेटच्या लायटरमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्प्रे बाटलीचा अचानक स्फोट झाला.
यात तीघेही जखमी झाले. वडापाव तळण्याच्या शेगडीच्या वाफेमुळे बाटली तापून हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी येथील अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांना हटवण्यास सुरवात केली.





