पुणे – मागील दोन महिन्यांत मुठा नदीत तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, या पाण्यासोबत शेकडो टन कचरा नदीत वाहून आल्याचे समोर आले आहे. खडकवासला धरणानंतरच्या गावांपासून ते महापालिकेच्या हद्दीतही नदीत वर्षभर हा कचरा नदीत टाकला जात असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केल्यानंतर शेकडो टन कचरा नदीपात्रात साचला आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत असून, या कचऱ्याला पायबंद घालण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेकडून तिसऱ्यांदा हा कचरा उचलला जात आहे. खडकवासला धरणापासून महापालिका हद्दीतही नदीपात्र दोन्ही बाजूंनी सताड उघडे असल्याने हा कचरा नदीत टाकला जात असून, महापालिकेने त्याला पायबंद घालण्याची मागणी होत आहे. खड्कवासला धरणापासून मुठा नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावांचा समावेश महापालिकेत आहे. मात्र, त्यानंतरही या गावांमध्ये कचरा संकलनाची सुविधा नसल्याने वर्षभर नदीपात्राकडेला कचरा टाकला जातो. परिणामी, नदीत पहिल्यांदा पाणी सोडल्यानंतर हा कचरा वाहून येतो. मात्र, त्यानंतरही कचरा टाकला जात असल्याने प्रत्येक वेळी मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीपात्रात शेकडो टन कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पूरस्थिती ओसल्यानंतर महापालिका, शहरातील स्वयंसेवी संस्था हा कचरा उचलत असली, तरी पुन्हा तेवढाच कचरा येत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. नाल्यांच्या धर्तीवर जाळी का नाही? शहराच्या अनेक भागांत नदीपात्र रहिवासी हद्दीजवळ आहे. त्यामुळे नदीकाठावर कचरा टाकण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. अशाच प्रकारे शहरातील पुलांवरून, तसेच नाल्यांमध्येही कचरा टाकला जात होता. त्यामुळे महापालिकेने पुलांवर, तसेच नाल्याकडेला १५ फूट उंच जाळ्या बसविल्या आहेत. त्याच धर्तीवर नदीकडेला जिथे जास्त लोकवस्ती आहे, तिथे जाळ्या बसविण्याची मागणी नागरिक करत आहेत. “नाल्यात कचरा टाकू नये म्हणून अनेक भागात लोखंडी जाळ्या आहेत. त्यानुसार गरज आहे तिथे जाळ्या बसविल्यास कचरा येणार नाही, याबाबत पालिकेने विचार करावा. शहरात सध्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात कचरा आहे. तो रोखल्यास नदी स्वच्छ राहण्यास मदत होईल.”- डाॅ. दर्शन शहा (नागरिक) “पूरानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा येत आहे. तो काढण्यात येत असून, नदीपात्रात कचराच टाकला जाणार नाही, यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. “- संदीप कदम ( उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन)